सत्राणे उड्डाणे
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी॥
जय देव जय देव जय जय हनुमंता।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता॥
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द।
धगधगिला धरणीधर मानिला खेद।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद।
रामीं रामदासा शक्तीचा शोध॥
जय देव जय देव जय जय हनुमंता।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता॥